नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-आषाढी एकादशीचे औचित्य साधून हरोली (ता. कवठे महांकाळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीच्या वतीने शालेय परिसरात भक्तीमय वातावरणात बालगोपालांची वारकरी दिंडी काढण्यात आली. पारंपरिक पोशाखात सजलेल्या चिमुरड्यांनी या दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. सोहळादिंडीमध्ये शाळेतील लहान मुले-मुली विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर आणि पारंपरिक वारकरी पोशाख परिधान करून सहभागी झाले होते. बालगोपालांनी विठूनामाचा गजर करत शाळेच्या प्रांगणात शिस्तबद्ध रिंगण सोहळा साजरा केला. यावेळी मुलांनी 'राम कृष्ण हरी'च्या तालावर ठेका धरत अभंग आणि हरिपाठाचे सामूहिक पठण केले. चिमुरड्यांच्या या भक्तीभावाने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. शालेय परिसरातून निघालेल्या या पालखी-दिंडीचे गावातील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने स्वागत केले. जागोजागी पालखीचे पूजन करण्यात आले. लहान मुलांचा उत्साह पाहून गावकऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले.
जिल्हा परिषद शाळा हरोली मध्ये बालगोपालाची वारकरी दिंडी उत्साहात संपन्न
July 26, 2026
