नवचैतन्य टाईम्स कराड प्रतिनिधी (नौशाद भाई सय्यद):-कराड तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने चांगलाच जोर धरला. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामातील पेरण्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेततळी, ओढे-नाले आणि विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.दुसरीकडे, कराड शहरातील काही अंतर्गत रस्त्यांवर मात्र पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि चिखलामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुचाकी घसरून अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.विशेषतः शहरातील काही भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय वाढली असून रोजच्या प्रवासात अडथळे निर्माण होत आहेत. नागरिकांकडून तातडीने रस्त्यांची दुरुस्ती, पाण्याचा निचरा आणि चिखल साफ करण्याची मागणी करण्यात येत आहे.आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, कराड नगर परिषद या समस्येकडे तातडीने लक्ष देणार का? पावसाळ्यात नागरिकांना सुरक्षित आणि सुकर प्रवासासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याची भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.दरम्यान, हवामानाचा पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
