नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी):-जत तालुक्यातील संख येथे गुरुपौर्णिमा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. गुरुदक्षिणा घेण्याऐवजी गुरूंनीच शिष्यांना पिंपळ आणि चिंचाची रोपे भेट देत वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. जत तालुक्यातील संख येथील श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्यावतीने चिक्कलगी भुयारी मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष उपक्रम राबविण्यात आला. तुकाराम बाबा महाराजांच्या उपस्थितीमध्ये पादुका पूजन करत तुकाराम बाबा महाराज यांनी आपल्या शिष्यांना गुरू दक्षिणा घेण्या ऐवजी पिंपळ आणि चिंचाची वृक्षरोपे भेट देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी "वृक्षतोड रोखा, वृक्षलागवड करा" अशी साद तुकाराम बाबा महाराज यांनी उपस्थित शिष्यांना घातली. या उपक्रमानिमित्त वृक्ष दिंडीही काढण्यात आली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने 200 हून अधिक शिष्यांना वृक्ष भेट देऊन पर्यावरण संरक्षणाची अनोखी परंपरा जपण्यात आली.हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरत असून, समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचा एक प्रेरणादायी संदेश देत आहे.
