नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी{रामचंद्र कोरे-माळी}:-पंढरपूर वारीनिमित्त पायी दिंडी सोहळ्याने जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित व निर्विघ्न पार पडावा, यासाठी महामार्ग पोलीस केंद्र, कवठेमहांकाळ (जिल्हा सांगली) यांच्या वतीने विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील बोरगाव टोल नाका येथे ही मोहीम पार पडली. यावेळी महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांनी आपल्या सहकारी अधिकारी व अंमलदारांसह पायी जाणाऱ्या वारकऱ्यांशी संवाद साधला. महामार्गावरून पायी प्रवास करताना अपघात टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या मोहिमेतील प्रमुख बाबी खालीलप्रमाणे:-
• वारकऱ्यांसाठी सूचना :- महामार्गावरून चालताना दिंडीने नेहमी रस्त्याच्या कडेने (डाव्या बाजूने) आणि शिस्तबद्ध रांगेत चालावे. मुख्य रहदारीच्या रस्त्यावर येऊ नये, जेणेकरून वेगवान वाहनांमुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही.
•दिंडीतील वाहनचालकांना मार्गदर्शन :- दिंडीसोबत असणाऱ्या साहित्य व इतर वाहनांच्या चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे. वाहने महामार्गावर उभी करताना ती सुरक्षित अंतरावर आणि इतर वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने पार्क करावीत.
• रिफ्लेक्टरचे वाटप व बसवणी :- रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाशात महामार्गावरील इतर वाहनचालकांना दिंडीतील वाहने दुरूनच स्पष्ट दिसावीत, यासाठी महामार्ग पोलिसांकडून सर्व वाहनांना रिफ्लेक्टर (परावर्तक पट्ट्या) वाटप करून ते वाहनांवर लावण्यात आले. या उपक्रमामुळे वारकरी बांधवांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती निर्माण झाली असून, दिंडीप्रमुख व वारकऱ्यांनी महामार्ग पोलिसांच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग पोलीस केंद्र,कवठेमंहाकाळ येथील अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडला.

