NCT NCT कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये शेतीच्या खरीपपूर्व कामांना वेग, बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरद्वारेच मशागतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये शेतीच्या खरीपपूर्व कामांना वेग, बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरद्वारेच मशागतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर (जालिंदर शिंदे):- चालू वर्षी मान्सूनवर एल निनोचे सावट असल्याने पावसाचे प्रमाण हे जेमतेमच राहाणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तविल्याने कवठेमहंकाळ तालुक्यातील शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील बरीच शेतीही पावसावर आधारित असून,तालुक्याच्या काही भागात जलसिंचन योजनेचे काम झाले आहे पण या योजनेचे पाणी म्हणजे नेहमी 'वराती मागून घोडे' असे राहीले आहे.त्यामुळे चालू वर्षीही बळीराजाला नेहमी प्रमाणेच मोठ्या धाडसाने पेरा करावा लागणार आहे.          सध्या रखरखत्या उन्हातही तालुक्यातील बळीराजाला खरीपाच्या पेरणीचे वेध लागल्याने तो पेरणीपूर्व मशागतीमध्ये गुंतला आहे.यामध्ये पालापाचोळा गोळा करणे,बांधबंदिस्त करणे, जमीनीची नांगरट व खुरपणी करणे,रोटर मारणे त्याचबरोबर नैसर्गिक खतांचा मात्रा देणे इत्यादी कामे तो सध्या उरकून घेत आहे.खरीप हंगामासाठी कृषी कर्जाचे वितरित लवकर करावे,बी बियाणे व रासायनिक खते वाजवी दरात उपलब्ध करून द्यावे अशी वाजवी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.  कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्र हे २१३७४ हेक्टर इतके असुन त्यापैकी पेरणी क्षेत्र हे २०१०६ हेक्टर इतके आहे.गतवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामा जेमतेमच लाभला होता.तर रब्बी हंगामा वायाच गेला होता.त्यामुळे बळीराजा पहिलाच आर्थिक संकटात आहे.चालूवर्षी तर एल निनोचे मान्सूनवर सावट रहाणार असल्याचे हावामान खात्याने भाकीत वर्तविल्याने 'आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास' अशी बळीराजाची गत झाली आहे.तरीही मोठ्या धाडसाने मशागतीला सुरुवात केली आहे.           तालुक्यातील सततच्या दुष्काळाने गांजलेल्या बळीराजाला बैलजोडी जतन करणे मुश्किल झाल्याने आपसूकच तालुक्यात बैलांची संख्याच रोडावली असल्याने बळीराजाला ट्रॅक्टरचा आधार घेत आहे.सदर मशागती बरोबरच बी बियाणे व खते खरेदीसाठी कर्ज घेण्यासाठी ग्राम सोसायटीच्या वतीने बॅंकेत शेतकर्यांची गर्दी जानवत आहे. सध्या रखरखत्या उन्हाचा मे महिना सुरू आहे.जुन मध्ये सामान्य का होईना पाऊसास सुरुवात होणार आहे असे भारतीय हावामान खात्याने वर्तविल्याने खरीपाच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठीची बळीराजाची धडपड सुरू झाली सुरू झाली आहे.सध्याचे मशागतीचे दर पुढीलप्रमाणे..........

१) नांगरट करणे -- ३०००/- ते ३५००/- रुपये (प्रति एकर)

२) रोटर मारणे -- १६००/- ते २०००/- रुपये (प्रति एकर)

३) पजा (फण) मारणे -- १२००/- ते १५००/- रुपये (प्रति एकर).तर तालुक्यातील खरीप हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र हे २१३७४ हेक्टर त्यापैकी पेरणी क्षेत्र सुमारे २०१०६ हेक्टर इतके असुन त्यापैकी प्रमुख पीक निहायी हेक्टर मध्ये पुढीलप्रमाणे आहे.......

१) ज्वारी -- ३०१३ हेक्टर.

२) बाजरी -- ७६७७ हेक्टर.

३) मका -- ५७६० हेक्टर.

४) मुग -- ४९१ हेक्टर.

५) उडीद -- २४८२ हेक्टर.

६) तुर -- १६० हेक्टर.

७) भुईमूग -- ९२४ हेक्टर.

८) सोयाबीन -- १७८ हेक्टर.

       तर पुर्वपार चालत आलेली पण पेरणीतुन हद्दपार झालेले  सुर्यफुल,तीळ,जवस,करडई, कापूस ही पिके (००) हेक्टर आहेत.

पुर्वी थोडी थोडी पण अगदी सर्वच पिके ही बळीराजा आपल्या शेतात पिकवत होता.त्यामुळे त्याला विकतचे कोणतं धान्य काय घ्यावे लागत नव्हते.आज बर्याच ठिकाणी केवळ कर्तुती नसल्यामुळेच सोन्या सारख्या जमीनी पडीक आहेत हे दुर्दैव आहे.संपुर्ण तालुक्यातील जमीन ही कसदार आहे.येथे सर्वच पिके चांगली येतात.पण पुर्वी सारखी निसर्गाची साथही राहीली नाही.याला काय म्हणायचं.
          बबनराव महादेव जाधव

    (वयोवृद्ध शेतकरी घाटनांद्रे.)