NCT NCT ज्येष्ठ नागरिक सन्मानधन योजना तात्काळ मंजूर करुन अंमलबजावणीची मागणी

ज्येष्ठ नागरिक सन्मानधन योजना तात्काळ मंजूर करुन अंमलबजावणीची मागणी

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे ):-राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी जाहीर करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिक सन्मानधन योजना तात्काळ मंजूर करून तीची अंमलबजावणी करावी,अशी मागणी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानाच्या कवठेमहंकाळ शाखेच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणू करण्यात आली. तहसीलदार अर्चना कापसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिक सेवा व सुविधा विधेयक २०२५ जाहीर करून ज्येष्ठ नागरिकांना मासिक सन्मानधन देण्याची तरतूद केली आहे.मात्र,यासंदर्भात अनेक वेळा निवेदने, पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.राज्यातील लाखो ज्येष्ठ नागरिक वाढती महागाई, आरोग्यावरील खर्च व आर्थिक असुरक्षिततेमुळे कठीण परिस्थितीत जीवन जगत आहेत. आयुष्यभर समाज व राष्ट्राच्या उभारणीत योगदान दिलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार असून शासनाकडून होत असलेला विलंब त्यांच्या भावना दुखावणारा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.                        येत्या पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिक सन्मानधन योजनेचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी तसेच सन्मानधनाच्या अंमलबजावणीची निश्चित तारीख जाहीर करणे,योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, राज्यातील सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करावी या प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.                                                                       अगदी लोकशाही मार्गाने शासनाकडे मागणी मांडत असल्याचे सांगत,शासनाने दुर्लक्ष केल्यास राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. हे निवेदन तहसीलदारांनी शासनाकडे पाठवून ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय्य मागण्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा,अशी अपेक्षा व्यक्त ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात आली आहे. यावेळी बळवंत यमगर,प्रा शशिकांत पवारसह सभासद उपस्थित होते.

फोटो :- जेष्ठ नागरिकांच्या वतीने तहसीलदार अर्चना कापसे यांना निवेदन देताना बळवंत यमगर,प्रा शशिकांत पवार व इतर