नवचैतन्य टाईम्स पाचगणी वार्ताहर(नौशाद भाई सय्यद):-समाजाने दिलेल्या आधाराची परतफेड समाजकार्यातून व्हावी, या उदात्त विचाराने प्रेरित होऊन सामाजिक कार्यकर्ते दीपक कांबळे यांनी यंदाही नगरपालिका शाळांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरणाचा उपक्रम राबविला. त्यांच्या सातत्यपूर्ण सेवाभावी कार्याचे कौतुक करत पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे यांनी हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. बौद्ध पौर्णिमा तसेच महामानवांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून पँथर सेनेच्या वतीने भिमनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे भव्य शैक्षणिक साहित्य वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी नगरपालिका शाळा क्रमांक १ व २ मधील ३५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वह्या, लेखनसाहित्य व इतर आवश्यक शैक्षणिक वस्तूंचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नगराध्यक्ष बगाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "ज्ञान हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके आणि शैक्षणिक साधने पोहोचविणे म्हणजे उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणे होय. अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आत्मविश्वास वाढतो आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रेरणा मिळते." कार्यक्रमाच्या प्रारंभी पँथर सेनेचे राज्याध्यक्ष दीपक कांबळे यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी कार्याचा गौरव करत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, मुख्याधिकारी पंडित पाटील, नगरसेविका विमल भिलारे, नगरसेवक अमित कांबळे, महेश खांडके, नारायण बिरामणे, आकाश बगाडे, सुप्रिया माने, माधुरी कासुर्डे, परवीन मेमन, बांधकाम व्यावसायिक प्रशांत मोरे, महेश माने, अजिज भाई मर्चंट, वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्षा सुनंदा मोरे, राजू काकडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष जॉन जोसेफ, कार्याध्यक्ष अतिश भोसले, ॲड. आस्था कांबळे, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी, पालक तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश मोरे यांनी केले. श्रीकृष्ण कापसे यांनी सूत्रसंचालन केले, तर लक्ष्मण हिरवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देणारा हा उपक्रम सामाजिक उत्तरदायित्व, शैक्षणिक समानता आणि मानवतेचा संदेश देणारा ठरला. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत अशा लोकहितकारी कार्याचा विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

