NCT NCT "अमली पदार्थ मुक्त"मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करा-मा.पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे कवठेमहांकाळ

"अमली पदार्थ मुक्त"मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करा-मा.पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे कवठेमहांकाळ

सांगली जिल्हा पोलीस दलाची अमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम कवठेमहांकाळ मध्ये गुटखा-मावा विक्रेत्यांचे धाबे दणाणले

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी (रामचंद्र कोरे-माळी):-सांगली जिल्हा पोलीस दलाने अमली पदार्थ आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली असून, कवठेमहांकाळ शहरात पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने गुटखा, मावा व तत्सम पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.    सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर आणि जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ शहरात विशेष अमली पदार्थविरोधी पथके तैनात करण्यात आली आहेत.                                                        कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात गुटखा, मावा आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाईमुळे अनेक पानटपऱ्यांवरील बेकायदेशीर विक्रीला आळा बसल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी गुटखा व माव्याच्या थुक्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता आणि दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.       पोलीस प्रशासनाने नागरिकांनाही आवाहन केले असून, शहरात कुणीही चोरून गुटखा, मावा किंवा अन्य प्रतिबंधित पदार्थांची विक्री करत असल्याचे आढळल्यास त्वरित स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.अमली पदार्थमुक्त आणि स्वच्छ समाज निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या या मोहिमेला नागरिकांनीही सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.