नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी (नौशाद भाई सय्यद):-सातारा येथील काँग्रेस भवनात झालेल्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आणि नूतन जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील (आप्पा) यांच्या पदग्रहण सोहळ्याला जिल्हाभरातील कार्यकर्त्यांची विक्रमी उपस्थिती लाभली. हजारो कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसर काँग्रेसमय झाला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे तसेच प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते व सरचिटणीस हणमंत पवार यांनी कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्याचे आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.या मेळाव्यात संघटन विस्ताराला चालना देणाऱ्या विविध नियुक्त्यांचे स्वागत करण्यात आले. महाबळेश्वर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी राजेंद्र भंडारी, वाई तालुका काँग्रेस अध्यक्षपदी विलासराव पिसाळ आणि खंडाळा तालुका काँग्रेस अध्यक्षपदी डॉ. विजय शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. संघटन सृजन अभियानांतर्गत नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.नव्या नेतृत्वामुळे ग्रामीण भागात काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमात घोषणाबाजी,टाळ्यांचा कडकडाट आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे वातावरण भारावून गेले होते. सातारा जिल्ह्यात काँग्रेसच्या संघटनात्मक बळकटी साठी हा मेळावा महत्त्वाचा टप्पा ठरल्याची प्रतिक्रिया उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
