NCT NCT संरक्षण उद्योग क्षेत्रातील मानाचा तुरा! अनंत डिफेन्सला ‘स्टेट चॅम्पियन्स एमएसएमई ऑफ द ईअर २०२६’ राज्यस्तरीय पुरस्कार

संरक्षण उद्योग क्षेत्रातील मानाचा तुरा! अनंत डिफेन्सला ‘स्टेट चॅम्पियन्स एमएसएमई ऑफ द ईअर २०२६’ राज्यस्तरीय पुरस्कार

नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(अनंत कुलकर्णी):-महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रात नावीन्यपूर्ण कार्याचा ठसा उमटविणाऱ्या अनंत डिफेन्स सिस्टीम प्रा. लि.ला ‘स्टेट चॅम्पियन्स एमएसएमई ऑफ द ईअर २०२६’ या राज्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय ‘एमएसएमई दिना’निमित्त शनिवारी (दि. २७ जून) नवी मुंबई येथील सिडको येथे झालेल्या भव्य राज्यस्तरीय सोहळ्यात महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कंपनीचे संस्थापक चेतन धारिया यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.                                                  राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उद्योगविस्तार, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि औद्योगिक विकासातील मोलाचे योगदान याची दखल घेत अनंत डिफेन्स सिस्टीम प्रा. लि.ची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या पुरस्कारामध्ये प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि दोन लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.                                              या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लघु, लहान व मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सुमारे दोन हजार उद्योजक, उद्योग मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, उद्योग आयुक्त, विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना, एमएसएमई क्षेत्र हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून रोजगारनिर्मिती, निर्यातवाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि ‘आत्मनिर्भर भारत’च्या उभारणीत या क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे सांगितले. नवकल्पना आणि गुणवत्तेच्या जोरावर महाराष्ट्रातील उद्योग जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.                        अनंत डिफेन्स सिस्टीम प्रा. लि.ला मिळालेला हा राज्यस्तरीय सन्मान केवळ कंपनीच्या यशाचा गौरव नसून, महाराष्ट्रातील संरक्षण उद्योग क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारतीय तंत्रज्ञान, संशोधन आणि स्वदेशी उत्पादन क्षमतेला नवी दिशा देणाऱ्या उद्योगांपैकी एक म्हणून अनंत डिफेन्सने निर्माण केलेली विश्वासार्ह ओळख या पुरस्कारामुळे अधिक दृढ झाली आहे.          राज्य शासनाकडून प्राप्त झालेला हा प्रतिष्ठेचा सन्मान अनंत डिफेन्सच्या गुणवत्ता, सातत्यपूर्ण नवोन्मेष आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाची अधिकृत पावती मानला जात असून, आगामी काळात संरक्षण क्षेत्रात आणखी मोठी झेप घेण्याचा कंपनीचा निर्धार यामुळे अधिक बळकट झाला आहे.