NCT NCT महाबळेश्वर मध्ये काँग्रेसला नवे बळ; राजेंद्र भंडारी यांची ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती

महाबळेश्वर मध्ये काँग्रेसला नवे बळ; राजेंद्र भंडारी यांची ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती

नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी(नौशाद भाई सय्यद):-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभर सुरू असलेल्या संघटन सुदृढीकरण अभियानाला गती देत सातारा जिल्ह्यातील ब्लॉक काँग्रेस अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये महाबळेश्वर ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी राजेंद्र भंडारी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महाबळेश्वर तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला नवी दिशा मिळणार असल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीने २७ जून २०२६ रोजी जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, राज्यभर जिल्हानिहाय संघटन अधिक मजबूत करण्यासाठी निरीक्षकांनी विविध जिल्ह्यांचा दौरा करून स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर आलेल्या शिफारशींचा विचार करून ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्यांना अंतिम मंजुरी देण्यात आली.                                              प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्याबाबतचे पत्र सातारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष नामदेव काशिनाथ पाटील (आप्पा) यांना पाठविण्यात आले आहे.                        जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार कराड उत्तर, वाई, खंडाळा, पाटण, सातारा ग्रामीण, माण, कराड शहर, जावळी, कोरेगाव, महाबळेश्वर आणि फलटण शहर या ब्लॉकसाठी नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये महाबळेश्वर ब्लॉकची जबाबदारी राजेंद्र भंडारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.                                                                        राजेंद्र भंडारी यांच्या नियुक्तीमुळे महाबळेश्वर तालुक्यात काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला अधिक वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बूथस्तरावरील संघटना मजबूत करणे, नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे, युवक आणि महिलांचा पक्षातील सहभाग वाढविणे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविणे, या उद्दिष्टांवर आगामी काळात विशेष भर दिला जाणार असल्याचे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.    महाबळेश्वर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी या नियुक्तीचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पक्षविस्ताराच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार असून, संघटनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.राजकीय वर्तुळातही या नियुक्तीकडे महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात असून, महाबळेश्वरमध्ये काँग्रेस पक्ष अधिक सक्रिय आणि संघटित होण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल, अशी चर्चा सुरू आहे.