नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी (नौशाद भाई सय्यद):-वाई शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि परिसरात पावसाचे पाणी शिरल्याने दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला. मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. पाणी निचऱ्याची व्यवस्था अपुरी असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, नगरपालिकेच्या बंदिस्त गटारे (Closed Drainage) योजनेच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पाणी निचऱ्याची प्रभावी व्यवस्था करावी, गटारांची नियमित साफसफाई करावी आणि भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.दरम्यान, या घटनेमुळे शहरातील पावसाळी पूर्वतयारीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित यंत्रणेकडून याबाबत कोणती कार्यवाही केली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
