नवचैतन्य टाईम्स महाबळेश्वर प्रतिनिधी(नौशाद भाई सय्यद):-महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून धबधबे, दाट धुके आणि थंडगार वातावरणाने निसर्गाचे अप्रतिम रूप खुलले आहे. डोंगरदऱ्यांमधून कोसळणारे असंख्य धबधबे, ढगांनी वेढलेली शिखरे आणि सतत बरसणारा पाऊस पर्यटकांना अक्षरशः मोहून टाकत आहे. पावसामुळे महाबळेश्वरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असून वेण्णा लेक, आर्थर सीट, एलिफंट्स हेड पॉइंट, लिंगमळा धबधबा आणि विविध व्ह्यू पॉइंट्सवर निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. सततच्या पावसामुळे परिसरातील तापमानात लक्षणीय घट झाली असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. दाट धुक्याची चादर, थंडगार वारे आणि कोसळणारे धबधबे यामुळे महाबळेश्वरचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे."महाबळेश्वरला चला... धुकं, धबधबे, पाऊस आणि निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा मनमुराद आनंद घ्या!"
