नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे) :-कवठेमहांकाळ तालुक्यातील मुदत संपलेल्या तब्बल ११ ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी २०२६ पासून प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली असली,तरी सदर प्रशासकांना मर्यादित अधिकार देण्यात आल्याने सदर ग्रामपंचायतीची विकास कामे मात्र पूर्णपणे ठप्प झाली आहेत. परिणामी ग्रामस्थांना मूलभूत सुविधांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, शासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये ग्रामपंचायतची मुदत संपल्यानंतर शासनाने तत्कालीन सरपंचांना प्रशासकीय समितीवर विद्यमान 'प्रशासक' म्हणून नियुक्त केले आहे. मात्र, या प्रशासकांना धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकारच नसल्याने गावपातळीवरील अनेक महत्त्वाची कामे रखडली आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई, बंद पडलेले पथदिवे, नादुरुस्त सांडपाणी वाहिन्या, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधांच्या कामांवर त्याचा परिणाम झाला आहे.पाणी टंचाईसह रखडली अनेक कामे नवीन विकासकामांना मंजुरी मिळत नसल्याने या ग्रामपंचायतीचे नियोजनच कोलमडले आहे. विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी ही रखडली जात आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील ११ ग्रामपंचायती मध्ये फेब्रुवारी २०२६ पासून प्रशासकराज लागू आहे. अनेक गावात पाणीटंचाईची समस्या गंभीर असतानाही प्रशासकीय निर्बंधामुळे नवीन कामाचे इस्टिमेट, तसेच १५ व्या वित्त आयोगातील विकासकामे रखडून पडली आहेत. ''प्रशासक कार्यकाळात मोठा खर्च करता येत नाही.नवीन विकासकामांना मंजुरी मिळत नसल्याने सर्वच कामे आडून पडली आहेत.पाणी समस्येसारख्या तातडीच्या प्रश्नावरही मर्यादांमुळे कामे करता येत नाहीत.लवकरात लवकर कामे सुरू होणे गरजेचे आहे.'' असे सदर ग्रामपंचायतीच्या सर्वच सरपंच तथा प्रशासासकांचे मत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील सरपंच प्रशासक असणाऱ्या ग्रामपंचायती या पुढीलप्रमाणे ------- १) बनेवाडी २) नांगोळे ३) चोरोची ४) थबडेवाडी ५) रायवाडी ६) मोघमवाडी ७) इरळी ८) निमज ९) तिसंगी १०) म्हैसाळ- एम ११) जांभुळवाडी. फेब्रुवारी २०२६ महिन्यामध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंच असलेल्या व्यक्तींना शासनाने प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. मात्र या प्रशासकांना कोणतेही अधिकार नसल्यामुळे गावांमधील विकासकामे करता येत नसल्याने प्रशासकांची घुसमट होत आहे. मात्र यामुळे गावकऱ्यांच्या मनामध्ये असंतोष वाढू लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
