नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-आदित्य ऑलिम्पियाड स्कूल सांगलीचा विद्यार्थी कु. दर्शन दिनेश देसाई याने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याचा संशोधन निबंध International Journal of Engineering Development and Research (IJEDR) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन नियतकालिका मध्ये प्रकाशित झाला असून, या नियतकालिकाचा इम्पॅक्ट फॅक्टर ९.३७ आहे.इतक्या कमी वयात आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन नियतकालिकात संशोधन निबंध प्रकाशित होणे ही अत्यंत दुर्मिळ आणि अभिमानास्पद बाब मानली जाते. विज्ञान व संशोधन क्षेत्रातील त्याची जिज्ञासा, सातत्यपूर्ण परिश्रम, अभ्यासू वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यामुळे त्याला हे यश मिळाले आहे. कु. दर्शन देसाई याचे संशोधन कार्य आदित्य ऑलिम्पियाड स्कूलच्या जीवशास्त्र विषयाच्या शिक्षिका सौ. श्रुती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. तसेच संस्थेचे संचालक डॉ. चंद्रकांत पवार यांचेही त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले.दर्शनच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक तसेच शासकीय स्तरावरून त्याचे अभिनंदन होत असून, त्याच्या या कामगिरीमुळे आदित्य ऑलिम्पियाड स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. भविष्यात संशोधन क्षेत्रात तो आणखी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
