नेमकी घटना काय घडली?
शुक्रवारी दुपारी शिरढोण येथील हॉटेलच्या मागील शोषखड्ड्याची स्वच्छता करण्यासाठी कवठे महांकाळ हून पाच कामगार गेले होते. स्वच्छता करताना आधी यशवंत बिरू शेळके (वय ७६) खड्ड्यात उतरले. बराच वेळ ते वर न आल्याने त्यांना वाचवण्यासाठी आकाश उर्फ अक्षय अनिल बागडे (वय २३) उतरला. त्यानंतर तुषार बाळासाहेब कोष्टी (वय २५) उतरला. खड्ड्यातील विषारी वायू आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तिघांचाही गुदमरून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे तिन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मारूती(भाऊ) पवार यांची भूमिका आक्रमक -
याबाबत बोलताना मारूतीभाऊ पवार म्हणाले, "हे तिघेही गरीब कुटुंबातील कर्ते पुरुष होते. घरातील कमावणारा माणूस गेल्यावर त्या कुटुंबाचे काय होणार? सरकारने फक्त चौकशी करून थांबू नये. विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना ज्या पद्धतीने शासकीय मदत, विमा आणि नोकरी दिली जाते, त्याच पद्धतीने, त्याच न्यायाने या तिघांच्याही कुटुंबियांना शासकीय मदत मिळाली पाहिजे. गरीबाचा जीव स्वस्त आणि श्रीमंताचा जीव महाग, असा दुजाभाव सरकारने करू नये."
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या -
तिघांच्याही कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपये शासकीय आर्थिक मदत तात्काळ जाहीर करावी.प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे.
सफाई कामगारांसाठी सेफ्टी किट, मास्क, ऑक्सिजन सिलेंडर व सुरक्षा साधने सक्तीची करावीत. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी प्रशासनाने ठोस नियमावली तयार करावी.
आंदोलनाचा इशारा -
"जर ८ दिवसांत या कुटुंबियांना मदत मिळाली नाही, तर शिवसेनेच्या वतीने कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी," असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. या मागणीला तालुक्यातील शिवसैनिक व नागरिकांनी मोठा पाठिंबा दर्शवला आहे.
